Ganare Ghar ( Marathi)

गाणारं घर

प्रत्येक घराचं एक गाणं असतं टीपिकल खास
त्याच्या वाद्यातून निघालेल्या सुरात मिळतो त्याचा ताल

प्रत्येक घराचे आपले स्वतःचे असतात आवाज
त्या त्या घरातल्या लोकांनाच असतात ते पाठ
जसा आरोह आणि अवरोह त्यांच्या स्पेशल रागाचा !
आणि पकड जी उलगडत जाते वेळ चोवीस तासाचा!
बाहेरचे गेट उघडताना लागतो नेहमी तीव्र सा
किचन मधली आजी ओळखून म्हणते कोण आलंय पहा!

दाराचे आपटणे , खुर्च्यांचे दणके
वस्तू अलगद ठेवणे की आदळणे
ह्यावरून कळते कोणाचा आज मंद्र की तार सप्तकात जाणार सूर
त्याप्रमाणे सगळे निश्चित करतात जवळ जाणे किंवा पळणे दूर !

घरची लाडकी घेत राहते गोड सुरेल तान
ते ऐकून त्या घराचे तृप्त होतात कान
कधी कधी आळशी पणाने चालतो विलंबित ख्याल
दृत लयीतल्या तराण्यावर नाचवतो लेक धमाल
रोजच रचला जातो एक नवा रागविलास
कधी रटाळ, कधी रंजक, दुखी कधी झकास

ह्या रागावर जोपासतात वृद्ध अन् तान्ही बाळं
ऐकता ऐकता ते गुंफतात भूतभविष्याच सुरेल जाळं
ते चिर परिचित गीत घराचं ना ऐकताच ऐकतो आपण
त्या गीताच्या तालावरती आपली मुळे जपतो आपण

लागतो स्वर एखादा कधी तो वादी ,
विसंवादी अथवा विवादी
मग घराचं गाणं अजुन रमतं
बेसूर होऊ नये म्हणून घर सगळं धडपडतं

प्रत्येक घराचे आपले विशिष्ठ आवाज असतात.
दारं खिडक्या एका विशिष्ठ लयीत खडखडतात
लायटर ची टिन टीन, फ्रीज चा ह्म्म्म,
फ्लश चा खळ्ळं , पंख्याची किर किर, बादल्यांचा ठणका, घड्याळाची टिकटिक, कागदांची सळसळ..चपलांची फटफट
फोनची सरगम, देवघरातील घंटी ,
रेडिओ टीव्ही ची वटवट , अंगणातल्या पक्षाची टकटक,
गाडीचा हॉर्न, हास्याची तान
फोडणीचा ठा, ओरडायचा सां ..

ह्या सगळ्या वाद्यांच्या बेमालूम ताळमेळीने
तयार होतं ते असतं प्रत्येक घराचे गाणे

घर आणि त्याचं गाणं आपल्या रोमरोमात बसलं असतं,
ती सिंफनी आपल्या अस्तित्वाचा पुरावाच असते,
प्रत्येक घराचं असच एक गाणं असतं..


Comments

  1. घराचं गाणं. किती सुंदर कल्पना.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Mom ( English)

Muki Jhade ( Marathi)