राहुल चे गाणे... poem about a great concert of Pt Rahul Deshpande @ Nagpur in 2019

राहुल चे गाणे

तो गान गान होता
मी कान कान झाले
रंध्र रंध्रा तूनी माझ्या
राहुलचे गाणे टिपले

मोकळे भव्य पटांगण
रसिकांची होती गर्दी
पण मी मात्र एकटीच
दूर दूर वेगळी अगदी

त्याचे सूर भरुनी राहिले
सखोल स्वरसागरा सम
लाटांवर लाटा आदळती
मोगऱ्याच्या गंधासह

झुळूक येई शीतल शी
पायाशी मऊ मृदू धरा
स्थिर राही ना पाय माझे
चालती ते तरातरा

गर्द काळया आकाशी
होते रुपेरी ढग काही
बनुनी फाक कलिंगडाची
ऐके तो शुभ्र चंद्र ही

गरजणारे कधी कातर
कधी लडिवाळ ते सूर सूर
पखवाज तबल्याची थाप
ऐकता भरले ऊर ऊर

वेगवेगळी झाडे देखील
स्तब्ध चकित त्या वर्षावात
रोमांचित बकुळ तारे झडती
दाद देता कौतुकात

चहू दिशांनी वेढले त्या
आवाजाने सर्वांना
भारून टाकले वेड लावले
अद्भुत गायक मस्ताना

तालासोबत पावले माझी
उठती किंवा कधी थांबती
मीच स्वरमय होऊन गेले
विसरुनी गेले सर्व जगती

आलाप ताना सूक्ष्म कंपन
स्वरलहरी पोहचती थेट
चंद्राला करून स्पर्श एकदा
परतून येती किरणां समेत

बेधुंद बेहोश स्वरमग्न
मी विसरुनी गेले देहभान
अद्वितीय विलक्षण अनुभव
स्वर्गीय संगीताचे रसपान

कित्येक बैठकी ऐकील्या हो
हा थरार होता अकल्पित
मीच चंद्र मीच धरा मीच गाणे
होऊन गेले त्या महफिलीत

षडज पंचम कधी निषाद
सूर निरागस की विठ्ठल नाद
राहुलने घडविला सर्वांशी
त्याचा अंतर्गुढ संवाद

निर्गुणी भजने त्याची गुणातीत
पितामहांचे उतरवती ऋण
स्तब्ध चक्कित त्या गायनाने
हृदय व नेत्र येती भरून

तो दूर प्रकशात गात होता
सगळे मंत्रमुग्ध ऐकत होतो
कलेचा संवाद घडे आत्म्याशी
संगीत निनाद भोगत होतो.

अद्भुत घडले त्या दिवशी जे
कलेसमोर नतमस्तक मी
राहुलवर असो उदंड वरदान तुझे
सरस्वती तव चरणी प्रार्थना ही.







Comments

Popular posts from this blog

Mom ( English)

Muki Jhade ( Marathi)